न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं परवानगी दिली होती. त्यानंतर १० आणि ११ मे रोजी एका करोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यात आले होते. ही व्यक्ती या उपचारानंतर बरी झाली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्यांनी याबद्दल रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन केलं आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील याबाबत माहिती दिली असून त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
“प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी प्लाझ्मा थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे. ससूनच्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन,” अशा आशयाचं ट्विट मोहोळ यांनी केलं आहे. दरम्यान, २० मे पासून अन्य करोनाग्रस्तांवरही प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठात्यांकडून देण्यात आली.
नायर रुग्णालयात आत्तापर्यंत ३५ ते ४० वयोगटांतील दोन रुग्णांना ही उपचारपद्धती दिलेली असून दोन्ही रुग्णांमध्ये सुधारणा झालेली आहे. यातील एका रुग्णाला आता घरीदेखील सोडण्यात येईल, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.