- काही कामानिमित्त बिजलीनगरच्या नातेवाईकांकडे वास्तव्य…
- नागरिकांनी नातेवाईक व आप्तांना थोडे दिवस स्वतःपासून दूर ठेवावे – नामदेव ढाके…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील बिजलीनगर परिसरात आज एका महिलेला कोरोनाची बाधा झाली. मुळात संबंधित महिला रुग्ण ही बिजलीनगरमधील नसून, चिखलीतील पाटीलनगर परिसरात वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी संबधित महिला बिजलीनगर येथील साई कॉलनीत त्यांच्या नातेवाईकांकडे काही कारणास्तव आली होती.
दरम्यान महिलेला अचानक ताप आल्याने तिला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी महिलेला महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास सांगितले. भोसरी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता सबंधित महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निदान झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिजलीनगरमधील नातेवाईक व परिसरातील चार लोकांना महिलेच्या हाय रिस्क संपर्कात आल्याने महापालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे.
पिंपरी चिंचवड परिसरातील ‘ ब ‘ प्रभाग कोरोनापासून आजपर्यंत सर्वात सुरक्षित मानला जात होता. परंतु, एकामागून एक रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी व त्यानंतर आता बिजलीनगर परिसरात कोरोनाने आपलं जाळ घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत. त्यांनी आता तरी धडा घ्यावा. नातेवाईक व आप्तांना थोडे दिवस स्वतःपासून दूर ठेवावे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रभाग १७ मधील बिजलीनगर, चिंचवडेनगर मधील नागरिकांना केले आहे.