- सर्वसामान्य नागरिकांसह, नगरसेवकांचा आंदोलनात सहभाग – शहराध्यक्ष महेश लांडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- कोरोना विषाणूच्या संकटाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्य पातळीवर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करण्यात आले. पिंपरी- चिंचवडमधील सुमारे ५ हजार कुटुंब आणि भाजच्या १४ हजार कार्यकर्त्यांनी काळे मास्क आणि घराबाहेर हातात निषेधाच्या पाट्या घेऊन आंदोलन केले.
पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि प्रदेश पातळीवर दिलेल्या सूचनांचे पालन करीत शुक्रवारी ‘महाराष्ट्र बचाव-अंगण हेच रणांगण’ आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात महाराष्ट्र क्रमांक १ वर पोहचला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा व सरकारच्या नेतृत्वाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच आज महाराष्ट्राची दुरावस्था झाली आहे, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्य केल्या.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी राहत्या घरातील अंगणात आपले कुटुंब व मित्र मंडळीना बरोबर घेऊन आणि लोकप्रतिनिधी यांनी कार्यालया बाहेर फिजिकल डिस्टंस राखून आंदोलन केले आहे. कोरोनाबाबत राज्य सरकारच्या अपयशाचे फलक घेऊन काळे कपडे घालून, तोंडाला काळा मास्क लावून उभे राहून आम्ही निषेध व्यक्त केला आहे. घरच्या अंगणात आम्ही आंदोलन केले, कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडता येत नाही. त्यामुळे ‘आंगण हेच रणांगण’ असे या निषेधाचे स्वरुप आहे. सर्व पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला आहे.


















