न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- लॉकडाऊनमुळे रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना केंद्र शासनाच्या वतीने प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. त्याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी शुक्रवारी (दि .२२) पत्रकार परिषदेत केले. या वेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या की, रेशनकार्ड नसलेल्यांना मे व जून या दोन महिन्यासाठी प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो तांदूळ जवळच्या रेशन दुकानातून मोफत दिला जाणार आहे. रेशनकार्ड नसलेल्यांनी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातून त्यासाठी अर्ज घ्यावेत. ते अर्ज स्थानिक नगरसेवकांच्या शिफारशीने जवळच्या रेशन दुकानदारांकडे ३० मे रोजीपर्यंत जमा करावेत. त्यासाठी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे.















