- शहरात कोरोना प्रयोगशाळा उभारणीसाठी आयुक्तांसमवेत पदाधिकाऱ्यांचेही एकमत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे ३०० ते ३५० जणांचे घशातील घशातील द्रव नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. मात्र, एनआयव्ही, नारी व आयसर संस्थेकडून अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवस एकत्रित ठेवण्यात आलेल्या संशयितांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, असा सूर महापालिकेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढला.
महापालिकेच्या वतीने शहरात कोरोना विषयी सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के . अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, आदी उपस्थित होते.
कोरोनाचे अहवाल तातडीने मिळण्यासाठी पालिकेने स्वतः प्रयोगशाळा सुरू करावी किंवा खासगी एजन्सीचे सहाय्य घ्यावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. या सुचनांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.


















