न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- घरकुल परिसरात आक्या बॉन्ड आणि अमित चव्हाण या दोघांच्या टोळ्या आहेत. परिसरातील वर्चस्व वादातून या टोळ्यांमध्ये नेहमी भांडणे होत असतात. टोळीच्या वर्चस्ववादातून १५ मे रोजी अमित चव्हाण याच्यावर नऊ जणांनी घरकूल परिसरात खुनी हल्ला केला.
अमित चव्हाण टोळीने या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड याचा मित्र अनिकेत रणदिवे यांच्यावर शुक्रवारी रात्री कोयता, चॉपरने हल्ला केला. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा गठ्ठू मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिकेत याला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी (दि. २९) रात्री घरकुल चिखली येथे घडली. मयत अनिकेत याचे वडील प्रकाश महादू रणदिवे (वय ४४) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिल्या गायकवाड, आशुतोष कदम, अजय चव्हाण आणि त्यांचे तीन ते चार अनोळखी साथीदार या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अजय चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.