न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- येरवडा कारागृहातून खुनाच्या आरोपातील समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार होती. त्यांना घेण्यासाठी त्यांचे भाऊ नातेवाईक व मित्रमंडळी चारचाकी वाहनातून व दुचाकीवरून आले होते. हे सर्वजण विश्रांतीवाडी पोलीस स्टेशनसमोरून आरडाओरडा करीत जात होते. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या हुल्लडबाजी करणाऱ्यांचा पाठलाग करून फुलेनगर जवळ अडवून त्यांची चौकशी केली.
त्यांच्याजवळील वाहनातून एक गावठी पिस्टल काडतूस आणि लोखंडी बार आढळून आला. विशेष म्हणजे यात पिंपरी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश होता.
पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी फिर्याद दिली. पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी रा. भोसरी, आझाद शेखलाल मुलाणी, रा. चिखली, आदेश दिलीप ओकांडे रा. निगडी, मुबारक बबन मुलाणी रा. चिखली, संदीप किसन गरुड रा. तळेगाव दाभाडे, हुसेन जाफर मुलाणी रा. मुळशी, सिराज राजू मुलाणी रा. मुळशी, विनोद नारायण माने रा. मुळशी. या सर्वांवर आर्म ऐक्टनुसार तसेच राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि महाराष्ट्र कोविड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.