न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. आज गुरुवारी (दि. ११) रोजी हिंजवडी येथे विप्रो कंपनीने अद्ययावत कोरोना आरोग्य केंद्राची उभारणी केली. त्याचे उद्घाटन व लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.
यात ५०४ बेड, १८ व्हेंटिलेटर, २ अद्ययावत रुग्णवाहिकेसह सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ‘विप्रोने यासाठी १.८ लाख स्क्वेअर फुट इतकी आयटीची इमारत दिली आहे. ५ मे रोजी करार करून अवघ्या महिना सव्वा महिन्यात त्यांनी ती आम्हाला दिली आहे. विप्रो सामाजिक कार्यात सुद्धा किती वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने काम करते याचे हे रुग्णालय प्रतिक आहे. मी यासाठी रिशद प्रेमजी यांचे मन:पूर्वक आभार मानतो,’ असे उद्गार मुख्यंत्र्यांनी काढले.
दोन सुविधायुक्त रुग्णवाहिका सुद्धा विप्रो देत आहे. हे आता समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या रुग्णालयाचा उपयोग करण्याची वेळ कुणावरही न येवो. आणि ती आल्यास आनंदाने आणि ठणठणीतपणे बरे होऊन तो रुग्ण बाहेर पडो हीच सदिच्छा, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.