- आज खराळवाडी व कासारवाडीतील महिला व पुरुषाचा मृत्यू…
- आनंदनगर, सदगुरुनगर वाकड, जुनी सांगवीतील दहा रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. आज गुरुवारी ८६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या १०१७ झाली आहे. यात ४६ पुरुष व ४० महिलांचा समावेश आहे. आजमितीला ४६१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील कासारवाडी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा व खराळवाडीतील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण भाटनगर, पिंपरी, दापोडी, वाकड, आनंदनगर, साईबाबानगर, खराळवाडी, काळभोरनगर, नेहरुनगर, काळेवाडी, नानेकर चाळ, पिंपरी रेल्वे स्टेशन, बौध्दनगर पिंपरी, चिंचवडगाव, भोसरी, अजंठानगर, वाल्हेकरवाडी, दिघी, बोपखेल, मोरवाडी, येथील रहिवासी आहेत.
आज आनंदनगर, सदगुरुनगर वाकड, जुनी सांगवी येथील दहा रुग्णांना निगेटिव्ह चाचणी आल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५१६ वर पोहोचली आहे.
शहरातील जसा लॉकडाऊन शिथिल केला आहे. तशी शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.