न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- कोरोनाच्या काळात देशात व महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व व्यवहार पुन्हा नव्याने सुरू करण्याची ही संधी मिळाली.लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून, काही अटी घालून त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाशी लढताना अर्थचक्र बंद पडून चालणार नाही, हे लक्षात घेऊन ही शिथिलता देण्यात आली आहे. पण सुरक्षित अंतर ठेवून अतिशय सावधपणे काम करावे लागणार आहे. जनतेने संयम दाखवला नाही आणि निष्कारण गर्दी करत आहे यातून नियमांची पायमल्ली झालेली दिसून येते.
पालिकेच्या वतीने काही कोरोनाविषयी नियम व अटीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मैदाने, क्रीडांगण, उद्याने खुली करण्यात आली. व्यायाम करून तंदुरुस्त राहता यावे, सर्व जनतेचे तंदुरुस्त राहावे. यासाठी सरकारने तसेच पालिकेने ही सवलत दिली आहे. परंतु, पहिल्याच दिवशी लोकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसले. सद्यपरिस्थितीत शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढतच आहे आणि अशाच पद्धतीने जर शहरात स्थिती राहिली तर, रुग्णाची वाढ होईल. तसेच शहरात बाहेरून आलेले नागरिक यांचाही त्यात योग्य विचार करावा लागेल. नाहीतर प्रशासनाला नियोजन करताना खुप अडचणींचा सामना करावा लागेल.
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण जर लोकांनी विनाकारण गर्दी केली तर, त्यातून बाधा वाढत जाईल. सध्या शहरात रुग्णांची संख्या ११०० वर पोहचली आहे. आयुक्तांच्या अंदाजानुसार जून अखेर शहरात ३००० रुग्णांची संख्या असेल. पिंपरी चिंचवड शहरात प्रशासनाने योग्य पावले उचलावीत. ज्या सवलती लॉकडाऊन टप्पा ५ मध्ये दिल्या आहेत. त्यावर काही प्रमाणात निर्बंध आणले पाहिजे. शहरासाठी एक विशेष नियमवाली तयार करून अमलात आणावी आणि शहरातील कोरोनाचे संक्रमण आटोक्यात कसे येईल याचा विचार करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















