न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२०) :- दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई पुणे महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ खासगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलीसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले. मात्र त्यांना साईड न दिल्याच्या कारणावरून गाडीतील तरुण व साध्या वेशात पोलीस कर्मचारी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की झाली.
दोन्ही गटाकडून एकमेकाला मारहाण करण्यात आली. यात पोलीसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाला फार मार लागला. एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री लोणावळा येथील गवळीवाडा येथे घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील जयराज देवकर व माणिक अहिनवे या दोन पोलीस कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.