- सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी व गटनेत्यांशी चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके यांनी एक आठवडा लॉकडाऊन करा तर, विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी १० दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्याबाबत पालिकेच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला.
त्यावर आयुक्त हर्डीकर म्हणाले की, शासनाकडून किमान १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला जातो. पालिकेस ते अधिकार नाहीत. तसेच, सुरू झालेल्या कंपन्या बंद ठेवता येत नाहीत, असे सांगत आपली हतबलता स्पष्ट केली. मात्र, शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबाबत सर्व पक्षीय नेते, लोकप्रतिनिधी व गटनेत्यांशी चर्चा केली जाईल. सर्व सहमतीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक टप्प्यामध्ये भाजीपाला, फळे, मांसविक्रेते आणि घंटागाडी कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेला ‘ जनता कॅफ्यू ‘ हा नागरिकांनी स्वतःहून पाळावयाचा आहे. गुरुवारी व रविवारी घरातून बाहेर न पडता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत : ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवावे. महापालिका प्रशासनाला सहाय्य्य करावे.