न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयाकडून मनमानी कारभार केला जात आहे. बेड रिकामे असतानाही ते उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी महापालिकेने जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच, नागरिकांना बेड उपलब्ध व्हावेत म्हणून प्रत्येक रुग्णालयासाठी अधिकारी नेमावा. त्या संदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी पालिका प्रशासनाला मंगळवारी (दि. ७) दिले आहेत.
कोरोना उपचारसंदर्भातील आढावा बैठक मधुकरराव पवळे सभागृहात मंगळवारी (दि. ७) झाली. त्यात त्यांनी हे आदेश दिले. बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के, अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, पालिका रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या की, शहरात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोरोनाच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात.
पक्षनेते ढाके म्हणाले की, खासगी रुग्णालयात महापालिकेचे ‘ हेल्पडेस्क ‘ तातडीने सुरू करा. त्या डेस्कद्वारे किती बेड वापरण्यात आले, किती शिल्लक आहेत, यांचा नियमित आढावा पालिकेच्या वॉररूमला देण्यात यावा, त्यामुळे नागरिकांची सोय होईल.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेता त्यांची भरती करण्यात आली आहे. दहा रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. रुग्ण शोधमोहीम, पाठपुरावा तसेच, रुग्णांना समुपदेशन व वैद्यकीय मार्गदर्शन याकरिता ३० मल्टीपर्पज वर्करची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. कठोर अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील बिर्ला हॉस्पिटलमध्ये १५०, चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये १००, ईएसआय हॉस्पिटलमध्ये १००, नीरामय हॉस्पिटलमध्ये ४०, स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये १००, स्टार हॉस्पिटलमध्ये ५०, क्वार्ड हॉस्पिटलमध्ये २००, पिंपरीतील डॉ . डी . वाय . पाटील हॉस्पिटलमध्ये ३०० बेड उपलब्ध आहेत. वरील हॉस्पिटलमधील बेड कोरोना उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.