न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- करोनाची साखळी तोडण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळला. मात्र कंपन्या सुरू असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची ये-जा सुरु होती. लॉकडाऊनपूर्वी पोलिसांकडून कडक बंदोबस्त करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, हा बंदोबस्त ठराविक चौकांमध्येच दिसून आला.
लॉकडाउनमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या ४३४ जणांवर संध्याकाळपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. दुचाकीवर डबलसीट, विनामास्क, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ६९ नाकाबंदीची ठिकाणे असून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे सकाळपासून कर्तव्य बजावत आहेत.
दरम्यान, नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आज पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून उर्वरित ९ दिवस देखील अशाच प्रकारे नागरिकांनी सहकार्य करावे असे, आवाहन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.


















