- तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- सगळे नियम, कायदे धुडकावून लावत तब्बल २१ जणांनी आखाड पार्टीचा घाट घातला. एवढेच नाही तर स्वतःला ‘पत्रकार’, ‘नगरसेवक’, ‘गाववाला’ अशी भूषणे देत पोलिसांची हुज्जतही घातली. परंतु, पोलिसांनी तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना रविवारी (दि. १२) रात्री अकराच्या सुमारास आय्यप्पा मंदिरासमोर, पिंपरी येथे घडली.
अमर अशोक कापसे (वय ४२, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, पिंपरीगाव) याच्यासह अन्य वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे (वय ५०) यांनी सोमवारी (दि. १३) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी व जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तरी देखील आरोपींनी आखाड पार्टीचे आयोजन केले. पार्टीमध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला असता आरोपी अमर कापसे याने त्यांच्याशी हज्जत घातली. मी ‘पत्रकार’ आहे, मी ‘नगरसेवक’ आहे, ‘गाववाला’ असे म्हणून पोलिसांना नोकरी घालवण्याची धमकी दिली. तसेच, आरेरावीची भाषा वापरून गोंधळ घातला. पुढील तपास उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे करीत आहेत.


















