- पालिकेच्या कर्मचाऱ्यांची अशीही कमाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२०) :- मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नुकतीच सोळा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अंत्यसंस्कार करतेवेळी व रुग्णालयातून मृतदेह नेतांना नातेवाईकांना पीपीई किट देणे, मृतदेह प्लॅस्टिकमध्ये पूर्ण गुंडाळणे, तसेच, अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांना दूर ठेवणे असे काही नियम आहेत. मात्र शहरात हे नियम पूर्णतः पायदळी तुडविल्याचे चित्र आहे.
वायसीएम रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी कर्मचारी हात लावत नाही. नातेवाइकांना बोलावून तुम्ही तुमची सोय करा ना असे उत्तर दिले जात आहे. महापालिकेच्या प्रत्येक कारभारात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा नेहमीच होते. परंतु मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून पैसे मागण्याचा निर्लज्जपणा केला जात असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
अॅम्बुलन्सचा चालक, विद्युत शवदाहिनी येथील कर्मचारी प्रत्येकजण आपपल्या परीने पैसे मागत होते. मंगळवारी सकाळपासून भाटनगर लिंकरोड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह येत होते. ज्या कामाचा कर्मचारी पगार घेतात, ते कामही करत नसल्याचे दिसून आले. शेवटी नाइलाजाने नातेवाइकांनीच जीव धोक्यात घालून मृतदेह शवदाहिनीपर्यंत पोहचविले.


















