न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल पिंपरी चिंचवडमध्ये यंदा ९३.५३ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात ४.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदा मुलींनी निकालात सरशी घेतली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल यंदा ४. ६३ टक्क्यांनी जास्त म्हणजे ९६ टक्के इतका लागला. तर, मुलांना ९१. ४७ टक्क्यांवरच समाधान मानावे लागले.
यंदा बारावीसाठी शहरातून एकूण १७ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १७ हजार ३०५ जणांनीच परीक्षा दिली. त्यापैकी १६ हजार १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या ७ हजार ८७७ मुलींपैकी ७ हजार ५६२ मुली उत्तीर्ण झाल्या. टक्केवारीत हे प्रमाण ९६ टक्के इतके राहिले. तर, ९ हजार ४२८ मुलांपैकी ८ हजार ६२४ मुले उत्तीर्ण झाली. टक्केवारीत हे प्रमाण ९१. ४७ टक्के इतके राहिले.