न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. जुलै. २०२०) :- संशयितांची कोरोना चाचणी घेणे आणि रुग्णवाहिका व्यवस्थापनासाठीची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इंगळे यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सर्व ८ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील आणि रुग्णालयाच्या अंतर्गत संशयितांची कोरोना तपासणी अहवालाबाबत दैनंदिन रिपोर्टीग करावयाचे आहे.
तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी ते समन्वय ठेवणार आहे. तसेच समन्वय अधिकारी म्हणून वायसीएम रुग्णालयाचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. नितीन मोकाशी यांची नियुक्ती केली आहे.
कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करून घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी व वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत सांगडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या सर्व हेल्पलाईन तसेच, पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) या ठिकाणी आवश्यकतेसाठी समन्वय साधून रुग्णवाहिकाचे नियोजन करण्याची जबादारी कार्यकारी अभियंता प्रमोद ओभासे व वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रिस्टोफर झेवियर यांच्याकडे सोपविली आहे.


















