न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- शहरात करोनाचा उद्रेक झाला असल्याने खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पहिल्या टप्यात शंभर डॉक्टरांना रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही ते डॉक्टर कोविड रुग्णालयात रुजू न झाल्याने त्यांना महापालिका प्रशासनाने नोटीस काढली आहे. त्यामध्ये २४ तासात कोविड रुग्णालयात सेवेसाठी हजर झाले नाही तर दवाखान्याची नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
रुग्णांची संख्या दहा हजारापर्यंत गेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या डॉक्टर व परिचारिकांवर मोठा ताण येत आहे. परिणामी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ८ जुलै रोजी शहरातील शंभर खासगी डॉक्टरांना कोविड रुग्णालयात कामासाठी हजर होण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अद्याप ते डॉक्टर कोविड रुग्णालयात दाखल झाले नाहीत. त्यामुळे त्यांना महापालिका प्रशासनाने आज नोटीस दिली. त्यामध्ये २४ तासांच्या आत कोविड रुग्णालयात कामासाठी हजर राहिले नाही तर दवाखान्याची नोंदणी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत २४ तासात खुलासा द्यावा, अन्यथा तुम्ही महापालिका कार्यक्षेत्रात रुग्णसेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्सनास येत असल्याने महाराष्ट्र राज्यातील नोंदणी कौन्सिलकडे तुमची नोंदणी रद्द करण्याबाबत कळविण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले म्हणाले, आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत. मात्र आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जाणार आहे. यामध्ये एकही एमबीबीएस डॉक्टर नाही. त्यांना तुम्ही आयसीयूची जबाबदारी देणार आहात. म्हणजेच एकप्रकारे रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे. महापालिका आमच्यासाठी विमा अथवा इतर कोणत्याही बाबी लेखी स्वरुपात देत नाही.


















