न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. राज्यभरात पाऊस असताना मावळ तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. सध्या धरणात केवळ ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणी कपातीची शक्यता व्यक्त होत आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी, पिंपरी – चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला नाही. पवना धरण क्षेत्रात १ जून ते १५ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत केवळ ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दीड महिन्यात ५.८४ टक्कांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणात सध्या दोन महिने पुरेल इतके पाणी आहे.
शहरासाठी पालिकेकडून दररोज ४८० ते ४९० एमएलडी पाणी उचलले जाते. तसेच, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते. शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन लागू असले तरी पाण्याची मागणी कायम आहे. त्यातच पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने पाणी कपातीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.















