न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधितांचा आकडा अकरा हजारांच्या पुढे गेला आहे. नगरसेवकांसह महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २०) दुपारी दोन वाजता पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये महापौर, पदाधिकारी, गटनेते सभागृहातून तर, नगरसेवक गुगल मीटद्वारे सभेत सहभागी होणार आहेत.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून पालिकांच्या सर्वसाधारण सभा, विविध विषय समिती सभा झालेल्या नाहीत. महापालिका अधिनियमानुसार ३ महिन्यात सर्वसाधारण सभा न झाल्यास नगरसेवक पद रद्द होण्याची तरतूद आहे. त्यामुळे पालिकेच्या मार्च व एप्रिल महिन्याच्या तहकूब सभा जून महिन्याच्या सुरुवातीला झाल्या. मात्र, महत्वाचे विषय नसल्याने जून महिन्याची सर्वसाधारण झाली नव्हती.
सर्वसाधारण सभा नियमितपणे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घ्याव्यात, असा स्पष्ट आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने दिला आहे. त्यामुळे पालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.













