- बेशिस्त नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा लॉक डाऊनचा पर्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२०) :- नागरिकांनी खरबदारी न घेतल्यास, नियमांचे पालन न केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नाईलास्तव पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (दि. १९) दिला आहे. दहा दिवसांचा लॉकडाऊनमध्ये रविवारपासून शिथिलता देण्यात सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी ते संवाद साधत होते.
हर्डीकर म्हणाले की, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पालिका व पोलिस यंत्रणा सक्त कारवाई करीत आहे. गेल्या ५ दिवसांत तब्बल एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इतरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई ही कायम राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मला काय होणार, मला काही घेणे – देणे नाही, असे अनाठायी वागल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो पुन्हा वाढल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
संसर्गाची कोणतेही लक्षणे नसलेले ८० टक्के रुग्ण आहेत. त्यांनी घरीच राहावे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बी, सी, डी व्हिटॅमिन आणि झिंकचे सेवन करावे. गरम पाणी प्यावे. गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. दिवसातून २ वेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी. दीर्घ श्वासोच्छवासाचा नियमितपणे सराव करावा. त्यामुळे स्वत:ला निरोगी ठेवून कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखू शकाल, असा सल्ला आयुक्तांनी नागरिकांना दिला आहे.













