न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- शाळेमध्ये शालेय साहित्याची विक्री करू नये, असा शासनाचा आदेश असतानाही शहरातील खासगी शाळा आदेशाला न जुमानता पालकांना शाळेत बोलावून सक्तीने पुस्तके विक्री करण्याचा प्रकार वाकड येथील गुड सॅमरिटन शाळेत घडला. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने घटनास्थळी जावून शाळेच्या दोन खोल्या सील केल्या आहेत.
शहरातील शाळांकडून शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून कधी फीबाबत तर कधी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांकडे तगादा लावला जातो. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर महिनाभरातच शिक्षण विभागाकडे विविध शाळांच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संस्थाचालक आशिष गायकवाड यांना विचारणा केली असता, आम्ही पालकांना सक्ती केलेली नाही. पुस्तकांमध्ये दोन प्रकारचे सेट आहेत. त्यामधील कोणती पुस्तके हवीत ती घ्यायला सांगितले आहे.
शाळेसंदर्भात तक्रार आली की, ही शाळा पालकांना बोलवून शाळेत पुस्तक विक्री करत आहे. त्यांच्याकडे वेळापत्रकही होते आणि दोन दुकानदार पुस्तक विक्री करत होते. त्यामुळे पाहणी करून शाळेच्या दोन खोल्या सील केल्या आहे .
– विलास पाटील, पर्यवेक्षक तथा तक्रार निवारण अधिकारी, शिक्षण विभाग.


















