न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने सुरू केलेले १२ कोविड केअर सेंटर खासगी एजन्सी संस्था किंवा संघटनांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. मंगल कार्यालय व हॉटेलमध्येही सेंटर सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे शहरात लवकरच तब्बल १० हजार बेडच्या क्षमतेचे कोविड केअर सेंटर निर्माण होणार आहेत.
महापालिकेचे वायसीएम, भोसरी व नवीन जिजामाता रूग्णालय हे कोरोना उपचार रूग्णालय आहेत. आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शाहूनगरचे रिजनल टेलिकॉम सेंटर, किवळेचे सिम्बॉयसिस महाविद्यालय, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, मोशीतील आदिवासी विभागाचे वसतीगृह, संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, वाकड येथील बालाजी महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, म्हाळुगे – बालेवाडी येथील क्रीडा संकुल वसतीगृह, मोशीचे सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृह, चिखली घरकुल, म्हाळुगे – चाकण येथील म्हाडा वसाहत येथे कोविड केअर सेंटर आहे.
पालिकेच्या तालेरा, भोसरी, आकुर्डी, सांगवी, यमुनानगर, थेरगाव, जिजामाता रूग्णालयात अन्य रूग्णांवर उपचार केले जात आहेत. पालिकेने सुरू केलेले हे सेंटर खासगी एजन्सी, संस्था व संघटनांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेचे तेथील मनुष्यबळ नव्याने स्थापन केल्या जाणाऱ्या कोविड केअर सेंटरसाठी वापरता येणार आहे. तसेच, मंगल कार्यालये व हॉटेल चालकांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यास पालिका परवानगी देणार आहे. त्यांना पालिका खर्च अदा करणार आहे. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.


















