न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने बँकांच्या सहकार्याने शहरातील फेरीवाले, टपरीधारक, पथारीवाले, हातगाडी विक्रेते यांना १० हजार रूपयाचे कर्ज वितरीत केले जाणार आहे. त्यासाठी केंद्राच्या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे.
या कर्जाची परतफेड वर्षभरात करावी लागणार आहे. केंद्र शासनच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतून आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. लॉकडाऊनमुळे फेरीवाल्याच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे. हे विक्रेते सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.
ही योजना राबविण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत. समितीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक १ सदस्य, फेरीवाला संघटनेचे ३ सदस्य, नॉन बँकिंग व फायनान्स कंपनीचे १ सदस्य, शहर बचत गट समितीचे १ सदस्य, भूमि व जिंदगी आणि नागरवस्ती समितीचा प्रत्येकी १ सदस्य असणार आहे. समितीच्या माध्यमातून ही योजना राबविली जाणार आहे, असे नागरवस्ती विभागाचे सहायक आयुक्त उल्हास जगताप यांनी सांगितले.


















