न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील करोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील करोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास तीन आठवड्याचा वेळ दिला आहे.
पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला करोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने आपल्या प्रभागात करोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच करोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. करोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच करोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब असून अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.