- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचं कोरोनामुळे निधन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र झटणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार घेत होते. डॉक्टरांनी त्यांना आज शुक्रवारी मृत घोषित केले आहे. त्यांचा दफनविधी आज रात्री ८.०० वाजता निगडी दफनभूमी येथे होणार आहे.
नगरसेवक जावेद शेख यांना १६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः डॉ. परवेझ ग्रॅन्ट यांच्याशी चर्चा करून शेख यांच्याबद्दल विचारपूस केली होती. कोरोनाच्या विषाणुंची किडनीला बाधा झाल्याने अखेर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दरम्यान त्यांची ३० जुलैला घेतलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की इतर कारणामुळे याचे उत्तर अनुत्तरीतच राहिले आहे.


















