- औद्योगिक कामगारांना परवानगीची आवश्यकता नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील लॉकडाऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उद्या (दि. ०१) ऑगस्टपासून काही प्रमाणात शिथिल केला आहे. याबाबत आज शुक्रवारी त्यांनी नवीन आदेश काढला आहे. या आदेशान्वये शहरातील दुकाने, नागरी वसाहतीतील दुकाने, नागरी संकुलातील दुकाने सकाळी ९.०० ते सायं ७.०० या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजूला सम आणि डाव्या बाजूला विषम या तारखेप्रमाणे सुरु राहतील. परंतु नागरीक सामाजीक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील सर्व बाजारपेठा दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील.
शहरात मटण, चिकन यांची किरकोळ विक्री सर्व दिवशी सकाळी ९.०० ते सायं. ७.०० या वेळेत सुरु राहील. अत्यावश्यक सामान जसे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री शहरात सकाळी ९.०० ते सायं. ७.०० या वेळेत सुरु राहील. या काळात सकाळी ०९. ०० ते सायंकाळी ७.०० या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.
यापुर्वी भाजीपाला व फळे विक्री विनिर्दिष्ठ ठिकाणी सुरु राहील. किरकोळ भाजी विक्रेते यांना प्रभाग अधिका-यांनी पास दिल्यानंतरच नमुद करुन दिलेल्या जागेवरच भाजी / फळे विक्री करता येईल. अन्य पथारी विक्रेते अथवा फेरीवाले यांना किरकोळ सामान विक्री त्यांना प्रभाग अधिका-यांनी पास दिल्यानंतरच नमुद करुन दिलेल्या जागेवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत करता येईल. कोणत्याही हातगाडीवर खाद्य पदार्थांची विक्री अनुज्ञेय राहणार नाही. चहा, पान व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद ठेवण्यात येईल.
जीवनावश्यक तथा अन्य वस्तूंचे ( E – Commerce ), औषधांचे व तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी ८:०० ते रात्री १०.०० या कालवधीत सुरू राहील. अत्यावश्यक सेवांकरिता यापूर्वी पोलिसांमार्फत देण्यात आलेले पास दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत लागू राहातील. बाजार समितीतील व्यवहारांना सदरच्या आदेशामधून वगळण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहणेसाठी महानगरपालिकेकडून पुर्वपरवानगी घेणेची आवश्यकता असणार नाही. औद्योगिक आस्थापना १०० टक्के कामगार क्षमतेसह सुरु ठेवता येतील. तथापि सर्व खाजगी कार्यालये व माहिती तंत्रज्ञान विषयक आस्थापना जास्तीत जास्त ५० टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील व उर्वरित मनुष्यबळाब्दारे शक्य असेल तोपर्यंत घरातून कामकाज ( Work from Home ) करणेस प्राधान्य द्यावे. सर्व शासकीय कार्यालये ( आरोग्य , वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळून ) १५ % मनुष्यबळासह कार्यालये सुरू ठेवता येतील.
सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक खालील प्रमाणे सुरु करता येईल :-
» दुचाकी- चालक + एक ( हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक )
» तीन चाकी – चालक + दोन व्यक्ती
चारचाकी – चालक + तीन व्यक्ती
शॉपीग मॉल, मार्केट कॉम्पलेक्स सकाळी ९.०० ते सांयकाळी ७.०० वाजेपर्यंत दि. ५. ऑगस्टपासून पासून सुरू करता येतील. त्यामध्ये थिएटर, फुड कोर्ट, रेस्टॉरंट बंद राहतील कोर्ट, रेस्टॉरंट मधील घरपोच सेवा सुरळीत राहतील.
संपुर्ण प्रतिबंधीत करणेत येत असलेल्या बाबी :-
केंद्रिय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास, विशेष आदेशाद्वारे परवानगी प्राप्त प्रवासाव्यतीरिक्त सर्व देशांतर्गत विमान व रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक, मेट्रो, रेलप्रवास, शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा (वैद्यकिय , पोलीस , सरकारी कार्यालये , बस डेपो , रेल्वे स्टेशन , विमानतळ , अलगीकरण केंद्र याठिकाणीचे उपहारगृह राहतील) सिनेमा हॉल, व्यायामशाळा , जलतरण तलाव , बार , सर्व प्रकारचे सभागृह , नाट्यगृह , मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा, सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय , क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम, सर्व धार्मिक स्थळे, सर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील.
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील उक्त आदेशातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य क्षेत्रातील सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने यांना सदर आदेशातुन वगळण्यात येत असुन ती संपुर्ण कालावधीकरीता खुली राहतील. रात्री ९.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत नागरिकांच्या सर्वच हालचालींना मज्जाव राहणार आहे, असे या आदेशात पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.