न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून दि. ०१ ऑगस्ट ते ०५ ऑगस्ट दरम्यान वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२० ची सुरुवात सनई वादक सदाभाऊ नेटके यांच्या पारंपारिक सनई वाद्नाद्वारे करण्यात आली. त्यानंतर प्रा.प्रदीप कदम यांनी आपल्या व्याख्यानामधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व वेबिनारच्या माध्यमातून आयोजित करून अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आभार मानले.
आपल्या व्याख्यानामध्ये प्रदीप कदम म्हणाले, कोणत्याही महापुरुषाचे विचार जाणून घेण्यासाठी आपल्या डोळ्यांवर असलेले जातीधर्माचे चष्मे काढणे आवश्यक आहे. आजच्या या काळात अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी केलेले कार्य, साहित्यामध्ये दिलेले योगदान किती बहुमुल्य आहे हे डोळसपणे समजून घेण्याची गरज आहे. अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेले साहित्य हे कोणत्याही एका समाजासाठी नसून ते सर्व मानव जातीला संदेश देणारं व प्रेरणा देणारं साहित्य आहे असेही ते म्हणाले.
दुपारी आयोजीत करण्यात आलेल्या जागतिक साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षापर्यंत “भारतरत्न” या पुरस्कारापासून वंचित का ? या विषयावरील परिसंवादामध्ये प्रा.डॉ.सुनिल भंडगे, प्रा.डॉ. चंद्रकांत काळोखे, मार्तंड साठे, आदी सहभागी झाले होते. यावेळी मार्तंड साठे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम आम्ही करीत आहोत. सन १९७३ साली महाराष्ट्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण सारसबाग येथे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले तेंव्हा पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा हि मागणी करण्यात येत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देशातच नव्हे तर सातासमुद्रापार देखील वाचलं जातं.
प्रा.डॉ. चंद्रकांत काळोखे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून गाण्यांमधून त्यांना महापुरुषांविषयी असलेले प्रेम दाखवून दिले आहे. कष्टकरी लोकं जग सावरण्याचे काम करणार आहेत हे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या या परीस्थितीमध्ये खरे ठरत आहेत. राष्ट्र सन्मान ज्या व्यक्तीने सातासमुद्रापार नेला, शिवाजी महाराजांची थोरवी सातासमुद्रापार नेली अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या सर्वोच्य सन्मानापासून अजूनही दूर ठेवण्यात आलं आहे याबद्दल खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.
प्रा.डॉ.सुनिल भंडगे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून आपलं चरित्र जपणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचं एक वेगळ विश्व आपल्या सर्वांसमोर उभे केले. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत गेले पाहिजे व त्यासाठी आपण सर्वांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. अण्णाभाऊ साठे यांचे निवास्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे हि देखील सर्वांची इच्छा आहे. सर्व क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींना भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात आले असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना या सर्वोच्च पुरस्कारापासून वंचित का ठेवण्यात आले आहे या मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे असेही ते म्हणाले.
दुपारच्या सत्रामध्ये चंदन कांबळे व संच यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला तर प्रबोधन परवाच्या आजच्या दिवसाची सांगता उमेश गवळी, राहुल शिंदे,राखी चौरे, गणेश गायकवाड यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी करण्यात आली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष दत्तु चव्हाण, सचिव संजय ससाणे, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे, मुख्य संघटक मेघराज साळवे, भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, प्रा. धनंजय भिसे, हनुमंत कसबे, मनोज तोरडमल, अरुण जोगदंड आदी उपस्थित होते.
वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२० ला फेसबुक व युट्युबच्या माध्यमातून २३ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला.


















