न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट. २०२०) :- एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणाने विवाहित तरुणीच्या पोटात चाकूने हल्ला करीत तिचा खून केला होता. त्यानंतर स्वतः आरोपीनेदेखील पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
ही घटना शनिवारी चिंचवड परिसरातील अजंठानगर येथे घडली होती. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. तर आरोपी तरुण गंभीर जखमी झाला होता. आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्या विवाहित तरुणाचादेखील मृत्यू झाला आहे.
मृत आरोपीचे नाव अरविंद शेषराव गाडे (वय ३०, रा. अजंठानगर, चिंचवड). असे आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव राणी सतीश लांडगे (वय २९) असे आहे.
याबाबत विवाहितेचे पती सतीश विठ्ठलराव लांडगे (वय ३८) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.