- तरीही आयुक्त म्हणतात ऑगस्ट अखेर शहरात पन्नास हजार कोरोना रुग्ण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसपर्यंत हा आकडा ५० हजारांपर्यंत पोहचेल, असा अंदाज महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २३ हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या कोरोनाबाधित रूग्ण दुप्पट होण्याचा रेट १५ दिवसांचा आहे. हाच वेग पुढेही कायम राहिल्यास ५० हजारांचा आकडा १५ ऑगस्टच्या आसपास पार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हर्डीकर यांनी सांगितले. देशात कोरोना मृत्यूदर ३ टक्के इतका आहे. पुणे व मुंबईतही जवळजवळ तेवढाच दर आहे. मात्र, पिंपरी – चिंचवड शहरात तो १.६० ते १.७० टक्के इतका अल्प आहे. हा दर आणखी कमी करून तो १ टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
पालिकेकडून ३० कोटींचा खर्च
महापालिका प्रशासनाचा फोकस सध्या कोरोना उपचार व उपाययोजनांवर आहे. आतापर्यंत सुमारे ३० कोटींपर्यंत खर्च झाला आहे. कोरोना चाचणीवर सर्वाधिक खर्च केला जात आहे. कोरोना चाचणीचे अहवाल शासनाच्या प्रयोगशाळेतून येण्यास विलंब होत असल्याने पालिकेने वायसीएममध्ये प्रयोगशाळा सुरू केली आहे. तसेच, अॅन्टीजेन टेस्टद्वारे आणि खासगी प्रयोगशाळेत तपासण्या सुरू आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये चांगले जेवण दिले जात आहे. वाढीव वेतन देत वैद्यकीय मनुष्यबळाची भरती केली जात आहे. नवीन सुविधा उपलब्ध केली जात आहे. रूग्णवाहिका, वाहने व बस भाड्याने घेतल्या आहेत. जम्बो सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पालिका सक्षम असल्याने कोरोनावर खर्च केला जात आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा प्रसार होणार हे गृहित धरून पालिकेच्या वतीने ऑक्सिजन बेड असलेली तात्पुरती रूग्णालये युद्ध पातळीवर उभी केली जात आहेत. डाटा एन्ट्री कामासाठी स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने गरज असून, स्वयंसेवक तसेच, सार्वजनिक गणेश मंडळ, हाऊसिंग सोसायट्यांनी पुढे येऊन पालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, शहरातील खासगी डॉक्टरांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.













