- बिर्ला, स्टार, डी. वाय पाटील, सिटी केअर रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) :- पिंपरी चिचवड महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार करणेबाबत सहभाग नव्हता. विशेषत: कॉर्पोरेट / धर्मादाय अत्याधुनिक सुविधा असणारे रुग्णालय उपचार करण्यापासुन दुर राहत असल्याचा अनुभव आल्यामुळे महाराष्ट्र शासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सद्यस्थितीत पंचवीस ते तीस रुग्णालयांना कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहमती दर्शविली.
काही दिवसांपासुन खाजगी रुग्णालय रुग्णांची आर्थिक पिळवणुक करत असल्याबददलच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, नगरसदस्य व नातेवाईक आणि सर्वसाधारण लोकामधुन आल्या होत्या. अशा तक्रारींचे तपासणी करण्यासाठी राज्य शासनाकडून निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी समितीची स्थापना केली. या समितीचे नेतृत्व भारतीय राजस्व सेवेतील एन. अशोक बाबु. सह आयुक्त (आयकर विभाग) हे करीत असून, त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैदयकीय व लेखापरीक्षण विभागातील अधिकारी सहाय्य करीत आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्देशानुसार कोवीड रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवणेबाबत निर्देश देणेत आले. सदर निर्देशाची व्यवस्थित अंमलबजावणी होते किंवा नाही? याची तपासणी करणेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वॉर रूममध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
या समितीने शहरातील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल, स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांना भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान जे विविध मुद्दे समितीच्या निर्दशानास आले. त्यात रुग्ण दाखल करण्यासाठीचे शुक्ल, एक्स – रे शुल्क, औषध खर्च करण्यासाठीची आकारणी केली जाते. सदर आकारणी राज्य शासनाच्या अधिसुचेनुसार पी.पी.ई कीट वगळता र.रु. ४००० / -, र.रु. ७५०० / -, र.रु. ९००० / – अशा तीन दराप्रमाणे रुग्णास कोणत्या प्रकारचा उपचार दिला जातो. यावर केली जाणे अपेक्षित आहे. तथापि या विहित दराव्यतिरिक्त अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जाते.
सदर बिल आकारणी योग्य नसल्याबाबत या रुग्णालयाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस एन. अशोक बाबु यांनी पाठविल्या आहेत. या नोटीशीब्दारे कोविड १९ उपचाराच्या बाबतीत विहित नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सुयोग्य दंडात्मक कारवाई का करु नये? अशी विचारणा एन अशोक बाबू, आय.आर.एस. यांनी केली आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोवीड- १९ ची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतेही लक्षणे नसणा-या asymptomatic and symptomatic रूग्णांना रुग्णालयात दाखल न करुन घेण्याचे निर्देश आहेत. सदर निर्देशाचे उल्लंघन करुन असे रुग्ण दाखल करुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतही संबंधित रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे.
तसेच पी.पी.ई कीटचे दर आकारणी बाबत एकुण दाखल रुग्णांची संख्या व वापर केलेल्या पी.पी.ई. कीट याचा ताळमेळ घेउन यथाप्रमाणे पी पी ई किट चे दर आकरणी करण्याबाबत निर्देश दिले असुन, सर्व संबंधीत रुग्णांच्या बिल देयकाची फेरगणना करुन त्यांना अनुज्ञेय असणारा परतावा देण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. विहित निर्देश निकष व नियम याचे उल्लंघनाबाबत ज्या रुग्णालयांना नोटीस जारी केली आहे. त्या रुग्णालयांनी त्यांचा खुलासा एका आठवडयात सादर करण्याचे त्यांना सुचित केले आहे.
समिती प्रमुख तथा सह. आयुक्त एन. अशोक बाबु यांनी सर्व रुग्णालयांना कोवीड- १९ ने बाधित अशा सर्व रुग्णांना प्रथम दाखल करुन घेणेबाबत व कोणत्याही प्रकारचा अग्रीम जमा करण्याबाबत आग्रह न धरण्याचे आवाहन केले आहे व नंतर त्यांचेवर उपचार सुरु केल्यानंतर मग संबधितांच्या नातेवाईकांना अवगत करण्याबाबत सुचित केले आहे. चौकशी समिती व तपासणी समिती अशा सर्व कोवीड रुग्णालयांना नियमित भेट देणार असुन, तक्रारी व अनुचीत प्रथा यांचेबाबत तपासण्या करणार आहेत.
कोविड रुग्णांसाठी वेगळया प्रवेशद्वाराची तसेच निर्गमन द्वाराची सुविधा असावी. महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार कोवीड रुग्णांसाठी निश्चित केलेले दराचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे दर्शविण्याची दक्षता सर्व रुग्णालयांनी घ्यावी. जेणेकरून दरपत्रक सर्व संबंधीतांन उपलब्ध होईल सदर दरपत्रकाप्रमाणेच बिल आकारणी केली जाईल. याची दक्षता संबधित रुग्णालयाने घ्यावी, असे आवाहन एन. अशोक बाबु यांच्या समितीने रुग्णालयांना केले आहे.














