- वायसीएमच्या कोरोना आयसीयू कक्षासाठी डॉक्टर व परिचारिकांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना उपचार रूग्णालय, कोविड केअर सेंटरच्या कामकाजासाठी महापालिकेने मागविलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर व एमएसडब्ल्यू ( मास्टर ऑफ सोशल वर्क समाजसेवक ) पदासाठी तब्बल ९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील डाटा एन्ट्रीसाठी साडेसात हजार जणांनी अर्ज केले आहेत.
पालिकेच्या कोविड केअर सेंटर, दवाखाने व रूग्णालये येथील कामकाजासाठी ३ महिने कालावधीसाठी १०० डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्याची जाहिरात पालिकेने प्रसिद्ध केली होती. त्यांना दरमहा १९ हजार २५० रूपये मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी राज्यभरातून तब्बल ७ हजार ५०० अर्ज पालिकेस ऑनलाइन व पत्राने प्राप्त झाले आहेत.
तर, कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने ४० समाजसेवक ६ महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांना २३ हजार रूपये मानधन आहे. या पदासाठी तब्बल १ हजार ५०० जणांनी अर्ज केले आहेत. एकूण १४० पदासाठी तब्बल ९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छानणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर पात्र उमेदारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
दरम्यान, वायसीएमच्या कोरोना आयसीयू कक्षासाठी १३२ डॉक्टर व १२८ परिचारिका असे एकूण २६० जणांची ६ महिने मानधनावर नियुक्ती केली जाणार आहे. पालिकेने उभारलेल्या १५ कोविड केअर सेंटरसाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. उर्वरित १५० डॉक्टर व आवश्यक मनुष्यबळाची इतर ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेने आता कोविड केअर सेंटर आऊटसोर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुढे कोविड केअर सेंटरसाठी डॉक्टर, परिचारिका व इतर मनुष्यबळाची मानधनावर नियुक्ती केली जाणार नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.