न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये एका उच्च शिक्षित डॉक्टरची पेटीएमक़डून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करायच्या बहाण्याने मोठी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी डॉ. मिलिंद शरद गावडे (वय ५७, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १८ जून रोजी घडली असून गावडे यांनी शुक्रवारी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.
डॉ. मिलिंद गावडे यांच्या खासगी मोबाईल क्रमांकावर अज्ञात आरोपीने ७४७८८६८२८८ या मोबाईल क्रमांकावरुन फोन करीत आपण पेटीएमकडून (patym) बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले. परंतु, केवायसी अपडेट न झाल्याने त्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे फोनवरुन बोलणाऱ्या अज्ञात आरोपीने डॉ. गावडे यांच्या खात्यातून ५० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.