न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हें) :- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष अभय भोर यांनी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांची नुकतीच भेट घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एम. आय. डी. सी. क्षेत्रातील प्रत्येक कंपनीला डस्टबिन देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून कारखानदार तो रस्ता रस्त्यावर टाकणार नाही. तसेच घंटागाडीची सुविधाही देण्यात यावी, जेणेकरून उद्योजक आपल्या डस्टबिनद्वारा घंटागाडीला कचरा देतील, अशा आशयाचे मागणीचे निवेदन अभय भोर यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहे. यावेळी फोरमचे कार्तिक गोवर्धन, दिनेश रोहरा, नीलेश कुलकर्णी, गणेश जामगावकर, संतोष गायकवाड, संतोष गुरव, राहुल भगत व आदी उद्योजक उपस्थित होते.
अभय भोर म्हणाले की, या प्रक्रियांमुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य उभे राहणार नाही व स्मार्ट सिटीमध्ये आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचे नाव खराब होणार नाही. एकीकडे स्मार्ट सिटी करण्याचे नियोजन चालू आहे व दुसरीकडे उद्योग क्षेत्रामध्ये असणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. बाहेरील देशांमध्ये दौरे होतात, परंतु इथे आल्यानंतर आपल्या शहरांमध्ये स्वच्छतेबाबतीत एवढी उदासीनता का?
सध्या काही घंटागाड्या फक्त काही विशिष्ट कंपन्यांचा कचरा उचलतात, कारण त्यातून त्यांना पुठ्ठा, प्लास्टिक, भंगार, जुन्या वस्तू मिळतात. बाकी उद्योजकांचा कचरा उचलला जात नाही. परिसरात कचरा कुंड्यासुद्धा नाहीत. स्वच्छ भारत अभियानदरम्यान औद्योगिक परिसराकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे, नुसत्या घोषणा होतात. परंतु, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तरी महानगरपालिकेने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.










