न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ इच्छुक आहेत. तसेच शाम लांडे, संतोष कोकणे हे दोघेही स्पर्धेमध्ये पुढे येण्याची शक्यता आहे.
सत्तेबाहेर असलेल्या या पक्षाकडे एकमेव महत्त्वाचे पद असल्यामुळे पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या पदावर कोणाला संधी देणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या महापालिकेतील विरोधी पक्षनेते हे एकमेव पद राष्ट्रवादीकडे आहे. या पक्षाचे सभागृहात ३६ आणि २ स्वीकृत असे ३८ चे संख्याबळ होते. यापैकी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने आणि जावेद शेख यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा रंगली आहे.