न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०) :- स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पिंपरीतील बाजारपेठ तिरंग्यानी सजून गेली आहे. प्लास्टीकवर बंदी असल्याने कापडी राष्ट्रध्वज बाजारात उपलब्ध आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त खादीचे कपडे आणि तिरंगी झेंड्यांना मोठी मागणी असते.
खादीच्या आणि पांढऱ्या रंगाच्या कुडत्यांची देखील क्रेझ तरुणाईमध्ये आहे. टोपी, तिरंग्याची थीम असणारे संघ जॅकेट्स, टी – शर्ट, ओढण्या दुकानाबाहेर लावण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनासाठी दरवर्षी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू असते. विविध कार्यक्रमांच्या रंगीत तालमी होत असतात. यंदा कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये बंद असल्याने शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि प्रभात फेरी पहायला मिळणार नाही. शासकीय कार्यालये, संस्था, संघटना आणि सोसायट्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.














