न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- खडकी येथे गॅस एजन्सी असून, एजन्सीचा कामगार दापोडी येथे राहण्यास आहे. शनिवारी (दि. १५) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कामगाराने गॅस सिलिंडर असलेली टेम्पोरिक्षा नेहमीप्रमाणे दापोडीच्या सीएमई गेट समोरील एका एटीएम सेंटरसमोर पार्क केला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टेम्पोतील १५ गॅस सिलिंडर आणि टाटा कंपनीची बॅटरी असा एकूण ८१ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले.
भोसरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करीत घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात संशयित आरोपी दिसून आला. फिर्यादीने आरोपीस ओळखले. तो आपल्याकडे यापूर्वी कामाला असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान आरोपी गॅस सिलिंडरची विक्री करण्यासाठी दापोडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्यास अटक केली.
राजाराम तेजाराम खावो (वय ३८, रा. जयमालानगर, पवनानगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवकिरण लक्ष्मण इटकर (वय २७, रा. रामनगर, वाघोली) यांनी रविवारी (दि. १६) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली.














