न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- करोनाच्या महासंकटामुळे यंदा पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा मान या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना शहरातील मान्यवरांच्या हस्ते केली जात असे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी म्हणाले, “दरवर्षी समाजातील विविध मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. मात्र, यंदा करोनाचे सावट पाहता गणेश मंडळांच्याच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. या आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणरायाची विधीवत पूजा करणार आहेत.”
यंदा करोनाच्या संकटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन घेतला आहे.
यंदा सर्व मंडळांनी भाविकांना ऑनलाइन गणरायाचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भाविकांनी या सेवाचा लाभ घ्यावा आणि रस्त्यावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.














