न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- फिर्यादी शारदा यांचा मुलगा आणि आरोपी हिना यांचा विवाह झाला. त्यानंतर सर्व कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. लग्नानंतर सून हिना हिने नवीन फ्लॅट घेण्याचा आग्रह केला. त्यानुसार, हिंजवडी फेज तीनमध्ये मुलगा वरुण, सून हीना आणि सासू शारदा या तिघांच्या नावावर ४३ लाख रुपये किमतीचा २ बीएचके फ्लॅट घेण्याचे निश्चित केले. दरम्यान, मुलगा वरुण कामानिमित्त चेन्नईला गेला. शारदा यांना लिहिता-वाचता येत नसल्याने फ्लॅटचे बुकिंग करण्यासाठी वेळोवेळी सून हिनाकडे सहा लाख रुपये दिले. सर्व रक्कम बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आले. दरम्यान, फिर्यादी शारदा यांच्या कौटुंबिक कारणांमुळे फ्लॅट घेण्याचे रद्द झाले.
फ्लॅट घ्यायचे रद्द झाल्याने बुकिंगसाठी दिलेली रक्कम बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली असता व्यावसायिकाने सून हिना हिच्या बँक खात्यावर पाठवून दिली. ही सर्व रक्कम घेऊन सून तिच्या माहेरी मध्यप्रदेश येथे निघून गेली. शारदा यांचा मुलगा वरुण यांनी पत्नी हिनाकडे रक्कम मागितली असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच ‘आम्ही तुला पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू पैसे घेण्यासाठी ग्वाल्हेरला आल्यावर तुला ठार मारून टाकीन’ अशी आरोपींनी वरूण यांना धमकी दिली. याबाबत सासूने सुन, सुनेचे आई, वडील आणि भाऊ या चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ जानेवारी २०२० पासून २८ जुलै २०२० या कालावधीत पुनावळे, वाकड येथे घडला.
सून हिना अशोक रोरा, सुनेची आई मेनका अशोक रोरा, सुनेचे वडील अशोक रोरा, सुनेचा भाऊ आशिष अशोक रोरा (सर्व रा. ग्रेड लष्कर ग्वालियर, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सासू शारदा अशोक नागवणी (वय ६२, रा. पुनावळे, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.














