- बांधकाम परवानगी देतानाच ‘ शिफ्टेड प्लॉट बाऊंड्री ‘ चा आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- जागा मालकांना इमारत बांधकाम परवानगी देतानाच ‘ शिफ्टेड प्लॉट बाऊंड्री ‘ केली जाणार आहे. प्रत्यक्ष जोते तपासणीचे वेळेस संबंधित जागामालक किंवा बाधकाम व्यावसायिकांकडून रस्त्याची जागा ताब्यात घेऊन ती पालिकेच्या नावे करण्यात येणार आहे.
त्यानंतरच संबंधिताना जागेच्या मोबदल्यात ‘ एफएसआय ‘ दिला जाणार आहे. या निर्णयामुळे छोट्या जागामालकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. या नव्या नियमास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
ढाके यांनी सांगितले की, ज्या जागा मालकांची जागा रस्त्यामध्ये बाधीत होत असेल त्याच्या मोबदल्यात त्यांना बांधकाम परवानगीच्या वेळेसच एफएसआय देण्यात येतो. तथापी ‘ शिफ्टेड बाऊंड्री ‘ करुन दिल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच रस्ता विकसित केले जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शिफ्टेड बाऊंड्री निश्चित करुनही बांधकाम व्यावसायिक किंवा मालक इमारतीची सीमा भिंत घालत नसल्याने त्या इमारतीच्या पुढे असणाऱ्या छोट्या छोट्या जागा मालकांना रहदारीसाठी रस्ता उपलब्ध होऊ शकत नाही. नवीन नियमामुळे छोट्या जागामालकांची अडचण होणार नाही. तसेच, संपूर्ण जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. असे ढाके यांनी स्पष्ट केले.