न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळे, नागरिकांनी यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा. सर्व गणेश मंडळानी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोविड योध्दे व स्वंयसेवक म्हणून पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा मनातील भाव मोठा असला पाहिजे. म्हणून यावर्षी गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूची असावी. मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास गणेशमूर्ती स्वंयसेवी संस्थाना मूर्तीदान कराव्यात. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटबीयांचे कोरोना साथीपासून रक्षण होईल.
त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी शासनाचे व महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.
मूर्तीदान करण्यासाठी महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय ०२०-२७६५०१५४, ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय ०२०-२७४५०१५३, ‘क’ क्षेत्रिय कार्यालय ०२०२७१२२९६९, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय ९६०७९५७००८, ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय ०२०-२७२३०४१०, ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय ०२०२७६५०३२४, ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय ७८८७८६८५५५, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय ०२०-२७१४२५०३ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.














