न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- मित्राला दारू पाजून कोरा चेक आणि आरटीजीएस फॉर्मवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्याआधारे खात्यातून चार लाख रुपये स्वतःच्या खात्यावर हस्तांतरित करून घेत फसवणूक केली.
याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १८) दिघी येथे घडली. याप्रकरणी सचिन अरुण पोकळे (३७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी गणेश वैजनाथ राठोड, बबन, अमोल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश आणि फिर्यादी हे एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी आरोपी गणेश याने फिर्यादी सचिन यांना ‘ टाटा मोटर्सचे काम आले आहे ‘ असे आमिष दाखवून पुणे – आळंदी रोडवरील दिघी येथील एका इमारतीमध्ये नेऊन दारू पाजली. त्यानंतर कोऱ्या चेकवर आणि आरटीजीएस फॉर्मवर जबरदस्तीने सह्या घेतल्या व त्यांच्या खात्यातून चार लाख रुपये वळते केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.














