- विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना महामारीच्या संकट काळात पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून भांडार व शिक्षण विभागाकडून थेट पद्धतीने खरेदीचा सपाटा लावला आहे. ही खरेदी अवाच्या सव्वा दराने खरेदी करून पालिकेची लूट केली जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बुधवारी (दि. १९) केला.
पालिकेच्या शाळा बंद असताना शालेय साहित्य खरेदीसाठी २ कोटी ४३ लाखांचा साहित्य खरेदीचा ठराव केला आहे. साहित्य खरेदीसाठी एकूण १ कोटी ११ लाख ८० हजार ७१५ खर्च आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी १ कोटी ३१ लाख ४१ हजार ७१० रूपये खर्च होणार आहे. संकटकाळातही पैसे कमावण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप व पालिकेच्या भांडार विभागाकडून सोडली जात नाही.
काही ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून पालिकेची लूट करण्याचे काम स्थायी समिती व प्रशासनातील काही अधिकारी थेट पद्धतीने करीत आहेत. ऑक्सिजन थेरपी मशीनचे १३० नग थेट पद्धतीने खरेदी करण्यात आले आहे. पुरवठादार कंपनीबाबत अनेक मुद्दे उपस्थित करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या कंपनीने ठेकेदारांना दिलेल्या चुकीच्या अधिकृतसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. उपकरणाची किंमत ९० हजार ते १ लाख १५ हजारांच्या आसपास असताना २ लाख ५९ हजार रुपयांना प्रत्येकी एक उपकरण खरेदी करण्यात आले आहे. त्याशिवाय १२ टक्के जीएसटीही पालिका भरणार आहे. या खरेदीपोटी तब्बल ३ कोटी ६४ लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे, असा आरोप काटे यांनी केला आहे.














