न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. ऑगस्ट. २०२०) :- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ कालावधीसाठी जिल्ह्यामध्ये योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे आवश्यक असल्याने सध्याच्या स्थितीत पात्र विद्यार्थ्यांना तांदुळ व अन्न शिजविण्यासाठीच्या खर्चाच्या दराच्या मर्यादेमध्ये धान्यादी मालाच्या स्वरुपात लाभ देण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत पोषण आहाराचा लाभ देण्याकरिता तांदूळ व धान्यादी मालाचे वाटप शाळास्तरावर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागणीनुसार २० दिवसांच्या आत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा पुरवठादाराने शाळास्तरावर करणे अनिवार्य राहील. शाळास्तरावर वजन करुन तांदूळ व धान्यादी माल घेण्यात यावा. माल प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती यांनी मालाचे नियोजन करावे. शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने विद्यार्थी किंवा पालकांना धान्याचे विहीत प्रमाणात वाटप करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या धान्यादी वस्तू…
१ ली ते ५ वीतील विद्यार्थ्यांना २६८ रुपये कमाल अनुज्ञेय खर्चाची मर्यादा राहील, तर ६ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांना कमाल ४०२ रुपये कमाल खर्चाची मर्यादा असेल. विद्यार्थ्यांना ६० कार्यदिनाकरिता तांदळाची मागणी १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना ६ किलो, तर ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ९ किलो या प्रमाणात नोंद करावी लागणार आहे.















