न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- गौरी आली, सोन्याच्या पावली; गौरी आली, चांदीच्या पावली…गौरी आली, गाई वासराच्या पावली…गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली… असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौराईंचे आज मंगळवारी घरोघरी आगमन झाले आहे.
महिलांनी घरोघरी गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले. त्यांना पारंपरिक आभूषणांनी, फुलांनी नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात आले. घरातील स्त्रियांनी गौरींसाठी फुलांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली.
यंदा करोनामुळे महिलांनी साधेपणाने गौराई बसवल्या आहेत. महिलांनी घरातच फराळ बनवून गौराईची मनोभावे आरास केली आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना मात्र महिलांना मुरड घालावी लागली आहे. तसंच पाहुण्यांनचे येणं ही कमी होणार आहे. उद्या गौराईंचे पूजन आणि परवा विसर्जन आहे.















