न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- हिंदुस्तान अँटीन्टीबायोटिक्स कंपनीच्या नेहरुनगर येथील मोकळ्या १२ एकर ९ गुंठे जागेचा ई-लिलाव होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या पुण्यातील अरोरा टॉवर्स येथील वसुली शाखेने याबाबतची नोटीस बजावली आहे.
एचए कंपनी हा केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील पहिला उपक्रम आहे. या कंपनीला १९९७ साली आर्थिक घरघर लागल्याने, केंद्र सरकारने एचएला आजारी कंपनी जाहीर केले. त्यावेळी १३५ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावरच कामगारांचे वेतन अदा करण्यात आले आहे.
सध्या कंपनीच्या मालकीची एकूण २६३ एकर जागा असून, त्यापैकी केंद्र सरकारकडून ८७.७ एकर जागा विक्रीची परवानगी मिळाली आहे. कंपनीने बँकाकडून घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी शिखर बँक म्हणून पंजाब नॅशनल बँकेची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ८७.७ एकर जागेची विक्री करण्याची परवानगी मिळाल्याने या जमिनीचे मूल्यांकन करण्याचे काम राष्ट्रीय बांधकाम निर्माण महामंडळाकडून (एनबीसीसी) केले जात आहे. मूल्यांकनाचे काम लॉकडाऊनमुळे रखडले आहे. लॉकडाऊननंतरच या प्रक्रियेला गती येणार आहे. जमीनीच्या विक्रीतून कंपनीला ४०० कोटी मिळण्याची शक्यता आहे. त्यामधून बँका व अन्य सरकारी देणी भागविली जाणार आहेत.
केंद्रीय रसायन मंत्रालयाच्या समन्वयाने मेटल ट्रेड स्कॅप कॉर्पोरेशन लि. (एमएसटीसी) च्या माध्यमातून जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. मात्र २०१३ ते २०१९ या सहा वर्षांच्या कालावधीत अनेकदा प्रयत्न करुनही या जमिनीची विक्री होऊ शकलेली नाही. तर पिंपरी – चिंचवड महापालिकेने यापैकी काही जागेवर आरक्षण टाकले आहे. एचए कंपनीने घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले असून, पंजाब नॅशनल बँकेने या जागेच्या लिलावाची नोटीस काढली आहे. केंद्र सरकारने विक्रीची परवानगी दिलेल्या ८७.७ एकर जमिनीपैकी १२.९ एकर जागा आहे.















