न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. ऑगस्ट. २०२०) :- भोसरी विधानसभेचे आमदार तथा पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, अशा वावड्या राजकीय विश्वात उठल्या आहेत. आज बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधरण सभेत चिंचवड विरुद्ध भोसरी असा संघर्ष पहावयास मिळाला. याचमुळे काही पदाधिकारी, नगरसेवक व पक्षातील गट-तट याला वैतागून त्यांनी आपल्याकडील शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, अशा बातम्या पक्षातीलच काही नामकरी पेरताना दिसत आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजप पक्षात मोठी हलचल माजल्याचे दिसते. सध्या सत्ताधारी पक्षाचा महापालिकेतील कारभार अपारदर्शक पद्धतीने सुरु असल्याचे दिसते. ऐनवेळी पक्षाचा अजेंडा झुगारून विरोधी पक्षाच्या नगरसेवकाच्या पारड्यात मतं टाकली जातात. स्थायी समितीचा कारभार हा त्याचा उत्तम नमुना. कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही. महापालिकेत सत्ता मिळून साडेतीन वर्षे उलटले तरी अनेक वाद अद्याप मिटलेले नाहीत.
आम्हाला विचारले जात नाहीत, असे म्हणत बहुतांश जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश पातळीवर तक्रारी केल्या होत्या. महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपमधील अनेकांना अद्याप सूरच गवसला नसल्याचे खुद्द भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी खासगीत सांगतात. त्यामुळे शहर भाजपमध्ये सर्वच अलबेल असल्याचे म्हणता येणार नाही. या सर्व बाबींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शहरातील सुधारणा आणि विकास कामांवर होताना दिसत आहे. त्याचेच द्योतक म्हणून आमदार लांडगे यांनी शहराध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी आपला राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपविला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शेवटी हा केवळ प्रसिद्धी स्टंट ठरतो की, भविष्यात याला आणखी वेगळे वळण मिळते हे पाहणे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे.
याबाबत अधिकृत माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, ही केवळ फेक न्यूज आहे. याला कोणताही आधार नाही, असे आमदार लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.















