न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला आहे. या निर्णयानुसार खरेदी – विक्रीच्या दस्तावरील मुद्रांक शुल्क दि.१ सप्टेंबर २०२० पासून ते दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या कालावधीत तीन टक्के, तर दि. १ जानेवारी २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क २ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे घर खरेदीदारांना दिलासा तसेच बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे.
करोनाच्या संकटामुळे विविध क्षेत्राला दिलासा देण्याबाबत शासन स्तरावरून चर्चा सुरू आहे. करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. यावर थोरात यांनी मुद्रांक शुल्कात कपात करण्यासंदर्भातचा प्रस्ताव नोंदणी विभागाकडून मागविण्यात आला होता. त्यावर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून सुमारे २७ रजिस्टर कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयात मिळून दर दिवशी सुमारे आठशेहून अधिक दस्त होतात. तर वर्षभरात सुमारे २८ ते ३० हजार दस्त नोंदवले जातात. करोनामुळे सध्या दस्तनोंदणी कमी होत असली, तरी मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यामुळे घरे खरेदी करण्यास चालना मिळणार आहे.


















