- पुढील महिन्यापासून राज्यभरात ‘ चेस द व्हायरस ‘ मोहीम राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. ऑगस्ट. २०२०) :- मुंबईपाठोपाठ आता राज्यभरातही पुढील महिन्यापासून ‘ चेस द व्हायरस ‘ मोहीम राबविण्यात येणार आहे. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संशयित रुग्णांचा शोध घेऊन उपचार केले जाणार आहेत. करोनारूपी संकट टळावे, नागरिकांना निरोगी आयुष्य लाभावे, अशीच गणरायाकडे मागणी करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बुधवारी अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचे ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
करोना रुग्णांसाठी मगर स्टेडियम येथे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. सॅनिटायझेशन केल्यानंतर शनिवारपासून (दि. २९) हे रुग्णालय सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे हे ऑनलाइन उद्घाटनात सहभागी झाले होते. खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, रॅपिड अँटीजेन चाचणीनंतर आता आवाजावरूनही चाचणी घेण्याचे नियोजन आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी – चिंचवडमध्येही अल्पावधीतच जम्बो कोवीड रुग्णालय उभारणीचे काम पूर्ण केल्याबद्दल ‘ शाब्बास पुणेकर ‘ असेच म्हणावे लागेल.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, करोनाने एकाही रुणाचा जीव जाऊ नये, यासाठी जम्बो रुग्णालयाची गरज होती. लढाई सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. संयम पाळून प्रति स्वतः बरोबरच कुटुंब आणि समाजाची काळजी घ्यावी.


















